शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी) येथील एका नगरसेवकाने रात्री महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती अत्याचार केल्याची संतापजनक घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी नगरसेवक शरद बारी याच्याविरुद्ध पहूर पोलिसांत बलात्कार व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेनंतर पळ काढण्याच्या तयारीत असतांना नगरसेवकाला ग्रामस्थांकडून चांगलाच ‘पब्लिक मार’ बसला.
महिलेचा पती घरी नसल्याचे पाहून नगरसेवक बारी हा शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जबरदस्तीने घरात घुसला. संबंधित महिलेने विरोध करूनही शरद बारी याने दरवाजा बंद करुन महिलेवर अत्याचार केला. तसेच ही घटना कुणालाही सांगितल्यास तुझ्यासह तुझ्या मुलांना जीवे ठार मारेल, अशी धमकी देत पीडितेवर अतिप्रसंग करू लागला. या प्रकाराची आसपासच्या नागरिकांना कुणकुण लागताच त्यांनी पिडीत महिलेची सुटका केली. याचवेळी पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या नगरसेवकाला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर नगरसेवकाविरुद्ध धमकी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहेत.