धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील संजय नगरमध्ये वर्षभरापूर्वी गटार बांधकाम करण्यात आले होते. अद्यापही गटारचे काम अपूर्णावस्थेतच आहे. यामुळे नगरपालिकाकडे वर्षभरापासून तक्रार करण्यात येत आहेत. परंतु कोणीही लक्ष दयायला तयार नाही. त्यामुळे आज परिसरातील संतप्त महिलांनी पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. तर या आंदोलनाला भाजपने पाठींबा दिला.
संजय नगरमधील गटारीत तळ न तयार करता बांधकाम पूर्ण केल्याचे दाखविले आहे. गटारीतील पाणी जाण्यासाठी सोय देखील केलेली नाही. त्यामुळे घाण साचून गटारीतील दुर्घंधी घरात येते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नगरपालिकाकडे वर्षभरापासून तक्रार करण्यात आल्या आहेत. परंतु कोणीही लक्ष दयायला तयार नाही. आता तक्रार कोणाकडे करायची म्हणून नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या केले आणि जोपर्यंत काम होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या ठिय्या आंदोलनाला भाजपच्यावतीने पाठींबा देण्यात आला.
यावेळी शिरिषआप्पा बयास, अँड. वसंतराव भोलाने, पुनीलाल आप्पा महाजन, गटनेते कैलास माळी, ललित येवले, मधुकर रोकडे, शरद आण्णा धनगर, कडू आप्पा बयास, शहराध्यक्ष दिलीप महाजन, सुनील चौधरी, वासुदेव महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, जितू महाजन उपस्थित होते.