मुंबई (वृत्तसंस्था) टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली आहे. न्यूझीलंडने 8 विकेट्सने भारताचा पराभव केला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या आणि राखीव दिवशी न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली.
अचूक रणनिती, संघातील खेळाडूंची योग्य निवड, प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बाजूंची माहिती आणि हवामानाचा अभ्यास या सर्व घटकांच्या जोरावर न्यूझीलंडने बलाढ्य भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. या सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात भारताला २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने भारताला जखडून ठेवत १७० धावांवर गुंडाळले. राखीव दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून ५३ षटकात १३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लॅथम आणि कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताचा पहिला डाव
जागतिक कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत न्युझिलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर पहिल्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करु शकले नाहीत. भारताचा पहिला डाव २१७ धावात आटोपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझिलंडच्या संघाने पहिल्या डावात २४९ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात न्यूझिलंडने भारतीय संघाला अवघ्या १७० धावांत गुंडाळलं.
भारताचा दुसरा डाव
न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे मातब्बर फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. भारताचे सर्व फलंदाज काही धावांच्या अंतरावर बाद झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या १७० धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारताकडून फक्त ऋषभ पंतने सर्वाधिक ४१ धावा केल्या. तर न्यूझीलंडच्या संघाकडून कर्णधार केन विल्यमसन याने ८९ चेंडूत ५२ तर रोस टेलर याने १०० चेंडूत ४७ धावा करत न्यूजीलंडला ऐतिहासिक विजयला गवसनी घालून दिली.
न्यूझीलंडला १३९ धावांचं माफक आव्हान
दुसऱ्या डावात टीम इंडियाचा संपूर्ण संघ १७० धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडला १३९ धावांचं माफक आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावध सुरुवात केली. या दरम्यान लॅथम ९ धावा करुन बाद झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वे १९ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी डाव सावरला. त्यांनी संथ गतीने विजयाच्या दिशेला मार्गक्रमण सुरु ठेवलं. या दरम्यान, केन याने अर्धशतक झळकावलं. त्याने ८९ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. तर टेलरने १०० चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. केन आणि टेलच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला भारताने दिलेलं आव्हान पेलनं सहज शक्य झालं. शेवटी न्यूझीलंडने भारतावर आठ गडी राखून विजय मिळवला.