नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल ३ लाख ९२ हजार ४८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ३ हजार ६८९ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आज ३ लाख ९२ हजार ४८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधितांचा देशातील आत्तापर्यंतचा एकूण आकडा १ कोटी ९५ लाख ५७ हजार ४५७ इतका झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ३६८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख १५ हजार ५४२ वर पोहचली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ७ हजार ८६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आत्तापर्यंत १ कोटी ५९ लाख ९२ हजार २७१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ कोरोनाचे अॅटिव्ह रुग्ण असून १५ कोटी ६८ लाख १६ हजार ३१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.















