जळगाव (प्रतिनिधी) कुत्र्याला घाबरून तरुणाने कुत्र्याला दगड मारत हटकल्याचा राग येत चौघांनी शिवीगाळ करीत तरुणाला लोखंडी पाइपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील हनुमान मंदिराजवळ घडली. जखमीच्या जबाबावरून शहर पोलिसात (Police) चौघा भावंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील शाहुनगरातील ताज पान सेंटर जवळील रहिवासी शेख वसीम शेख मुसा प्लंबर व्यवसायिक आहे. सोमवारी रात्री कामावरून घरी परतत असताना हनुमान मंदिरामागील सरदार तडवी यांचा पाळीव कुत्रा शेख वसीम यांच्या अंगावर भुंकला. चावायला नको म्हणून त्यांनी त्यास हटकले असता, त्याचा राग आल्याने सरदार तडवी यांनी शेख वसीम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांचे शाब्दीक वाद सुरु असतानाच आवाज ऐकून त्यांचे दोघ भाऊ नामदार तडवी व रहीम तडवी व जम्बो तडवी असे तिघे त्याठिकाणी आले. वाद वाढून सरदार तडवी यांनी त्यांच्या हातातील टेन्ट हाऊसची सब्बल शेख वसीम यांच्या डोक्यात मारली तर जम्बो तडवी याने लोखंडी पाईपने शेख वसीम, रहिम व नामदार तडवी यांनी मारहाण केली. जखमी तरुणाला उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याचा लेखी जबाब नोंदवून शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.