नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका मांत्रिकाने एका विधवा महिलेला फसवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुजरातमधील छोटा उदयपूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मांत्रिकाला अटक केली आहे.
वास्तविक संखेडा येथे राहणारे जोडपे मंदिरात जायचे. याच दरम्यान हे जोडपे एका मांत्रिकाच्या संपर्कात आले होते आणि त्यांचे कौटुंबिक संबंध बनले होते. पण मागील वर्षी महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतरही मांत्रिक हा त्यांच्या घरी येतच होता. यादरम्यान पीडितेला असे अजिबात वाटले नाही की मांत्रिकाची तिच्यावर वाईट नजर आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात महिलेला देखील कोरोनाची लागण झाली होती. ही बाब मांत्रिकाला समजताच त्याने महिलेला आपल्या घरी येण्यास सांगितले. यावेळी मांत्रिकाने सांगितलं की, ‘तू माझ्या घरातील वरच्या मजल्यावर राहा, जेणेकरून कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण होणार नाही.’ महिलेने देखील मांत्रिकाची आज्ञा पाळली आणि ती त्याच्या घरी राहायला गेली. यावेळी मांत्रिकाने तिला त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर वेगळं राहण्यास सांगितलं.
दरम्यान, या सगळ्यात एके दिवशी संधी साधून आरोपी मांत्रिक महिलेच्या खोलीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने महिलेला सांगितले की, ‘तिच्या पतीचा आत्मा माझ्या शरीरात आला आहे.’ आणि त्यानंतर त्याने महिलेवर बलात्कार केला. दुसरीकडे मांत्रिक आधीच विवाहित असताना देखील महिलेला लग्नासाठी बळजबरी करू लागला. अखेर या सगळ्या प्रकाराला वैतागून पीडितेने आरोपी मांत्रिकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. त्याचवेळी, या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘आरोपी हा एका मंदिरात पुजारी आहे आणि मांत्रिक म्हणून देखील काम करत होता. त्यानेच महिलेवर बलात्कार केला. यादरम्यान पीडितेने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण नंतर पीडित महिलेने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.