
जळगाव (प्रतिनिधी) : शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास पुलाचा भराव खचल्याने सध्या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक शहरातून वळवण्यात आली आहे. यामुळे जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवार दि. २० रोजी पहाटेच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या योगेश ऊर्फ युवराज कडून महाजन (वय ३८, रा. इच्छादेवी चौक) या तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बांभोरी पुलाजवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील ईच्छादेवी चौकात राहणारा योगेश उर्फ युवराज महाजन यांची इच्छादेवी चौकातच नाश्त्याची गाडी लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास दुचकारीने पाळधी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी जाण्याकरीता निघाले. घरापासून काही अंतर पार केल्यानंतर गिरणा नदीवरील बांभोरी पुलाजवळ एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर संवेदनाहीन अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून तत्काळ वाहन घेवून पसार झाला.
कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर नाश्त्याची गाडी चालवून योगेश
महाजन हे कुटुंबियांचा उदनिर्वाळ करीत होते. संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने दुर्देवी घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे परिसरात देखी हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
अपघातस्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. काही जागरूक स्थानिक नागरिकांनी तत्काळ ‘११२’ या हेल्पलाइनवर कॉल करून पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि योगेश यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे
















