
जळगाव (प्रतिनिधी) – एमडी ड्रग्जची तस्करी करतांना पकडलेल्या सराईत गुन्हेगार अजय बिरजू गारुंगे (रा. तांबापुरा) याला ड्रग्जचा पुरवठा तांबापुरातील शेख अजमल शेख इस्माईल उर्फ अज्जू मालेगाव (वय ४५, रा. तांबापुरा) याने पुरविल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. अज्जू मालेगाव हा ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांमध्ये मुख्य पुरवठादार म्हणजेच किंगपीन म्हणून काम करीत असून त्यानेच अजय गारुंगेसह फरार असलेल्या सोनू गणेश कुंभार (वय २५, रा. तांबापुरा) याला पुरवितो. तसेच हा किंगपीन जळगावसह धुळे, मालेगाव आणि बुलढाण्यात देखील ड्रग्जचा पुरवठा करीत असून त्याचा तेथील पोलीस देखील मागावर आहेत.
पाळधी तरसोद बायपास महामार्गावरील कचरा फॅक्टरीजवळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजय गारुंगे हा दि. १ ऑक्टोबर रोजी एमडी हा अमली पदार्थ विक्री करणाऱ्यासाठी आलेला असताना त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १ लाख ९३ हजार रुपये किमतीचे ६४.४४ ग्रॅम एमडी जप्त केले होते. न्यायालयाने सुनावलेल्या ४ दिवसांच्या पोलिस कोठडी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याची चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान अजय गारुंगे याने त्याच्याजवळ मिळून आलेले ड्रग्ज हे तो राहत असलेल्या भागातील त्याच्या ओळखीचा असलेला शेख अजमल शेख इस्माईल उर्फ अज्जू मालेगाव याच्याकडून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांकडून पुरवठा करणाऱ्याचा कसून शोध घेतला जात आहे.
फरार ड्रग्ज पेडलरांच्या शोधार्थ दोन पथके रवाना
ड्रग्जचा मुख्य पुरवठादार असलेला शेख अजमल उर्फ अज्जू मालेगाव याने अजय गारुंगेसह सोनू कुंभार याला देखील ड्रग्जचा पुरवठा केला आहे. शेख अजमलसह सोनू कुंभारचा देखील पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असून त्याकरीता दोन पथके रवाना करण्यात आली आहे.
जीममधील ओळखीतून सुरु झाली ड्रग्ज तस्करी
काही वर्षांपूर्वी अजय गारुंगे व शेख अजमल या दोघांची एका जिममध्ये ओळख झाली. तेथूनच दोघ एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांनी जळगावात एमडी ड्रग्जची तस्करी करण्यास सुरुवात केली. त्या दोघांचे नेटवर्क जळगावसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील पसरले असून त्याचा देखील पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
अज्जू मालेगाव हा ड्रग्ज बाजारातील किंगपीन
२० वर्षापासून गांजाची तस्करी करणारा शेख अजमल शेख इस्माईल उर्फ अज्जू मालेगाव (वय ४५, रा. तांबापुरा) हा मुंबईहून किलोने एमडी ड्रग्ज आणून त्याची जळगावसह धुळे, मालेगाव, बुलढाणा येथील पेडलरांना विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. एकाचवेळी अनेक पेडलरांना मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा करीत असल्यामुळे शेख अजमल उर्फ अज्जू मालेगाव हा या भागातील ड्रग्जच्या बाजारातील किंगपीन म्हणून ओळखला जावू लागला. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून धुळे, मालेगाव पोलिस देखील त्याच्या मागावर आहे.
पेडलरांना कमर्शिअल कॉण्टेटीमध्ये पुरवठा
गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी केलेल्या कारवायांमधून अनेक ड्रग्ज पेडलरांनो पोलिसांनी जेरबंद केले. त्यामुळे या कारवाईतून आणखी काही लहान-मोठे पेडलर असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच तीन दिवसांपुर्वी झालेल्या कारवाईतून शेख अजमल उर्फ अज्जू मालेगाव हा जळगावातील मुख्य पुरवठादार असून त्याने मुंबई येथून किलोने एमडी ड्रग्ज आणून त्याची जळगावसह धुळे, मालेगाव येथे त्याची विक्री करतो. किलोने आणलेल्या साठ्यातून ‘कमर्शिअल कॉण्टेटी ‘मध्ये तो पेडलरला त्याचा पुरवठा करीत होतो. त्यानंतर ते पेडलर मागणीनुसार त्याची विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे.
















