
जळगाव (प्रतिनिधी) – घरी परतत असताना दुचाकी घसरून डोक्याला जबर मार लागल्याने समाधान मधुकर पाटील (वय ४१, मूळ रा. कृष्णापुरी, ता. पाचोरा, हल्ली मुक्काम पिंप्राळा) हे जागीच ठार झाले. ही अपघाताची घटना दि. २ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अग्रवाल चौकातील उड्डाणपूलावर घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील खासगी रुग्णालयात कामाला असलेले समाधान पाटील हे (एमएच १९, एएस ६४११) क्रमांकाच्या दुचाकीने पिंप्राळाकडे जात होते. त्यावेळी उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी घसरली व ते दुभाजकावर आदळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ योगेश बारी करत आहेत.
खराब महामार्गामुळे अपघातांचे वाढते प्रमाण
शहरातून जाणारा महामार्ग जागोजागी खराब झाला आहे. अनेक ठिकाणी जागोजागी पॅच आहे. यामुळे दुचाकीचा तोल जाऊन लहान-मोठे अपघात होत आहे. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारक व शहरवासीयांकडून केली जात आहे.
















