बदायूँ (वृत्तसंस्था) मांत्रिकाला हात दाखवल्यानंतर सहाव्यांदाही मुलगीच होणार सांगितले. परंतू तरी देखील पत्नीने गर्भपातास नकार दिल्यामुळे एकाने आपल्या पत्नीचे पोटच फाडल्याची अंगावर काटे आणणारी महाभयंकर घटना उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात घडली आहे.
बदायूँ जिल्ह्यातील नेकपूर परिसरात ही घटना घडली आहे. पन्नालाल असे आरोपीचे नाव असून या दाम्पत्याला पाच मुली आहेत. संबंधित महिला ही सहाव्यांदा गरोदर आहे. तिने कोणत्या तरी मांत्रिकाला हात दाखवल्यानंतर सहावी मुलगीच होणार असल्याचे त्याने सांगितले. म्हणून पन्नालालने शनिवारी रात्री पत्नीला गर्भपात करण्यास सांगितले. पत्नीने नकार दिल्यानंतर त्याने तिच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. तर पन्नालाल याला मुलगा हवा होता. तिच्या गर्भात मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठीच त्याने पोटावर वार केले, असा आरोप पीडितेच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. आरोपी पन्नालाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून, तिला पुढील उपचारासाठी बरेली येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.