मुंबई (वृत्तसंस्था) चीनचा प्रश्न, महागाई, बेरोजगारी याच्या ऐवजी गल्लीबोळातले प्रश्न याच राष्ट्रीय समस्या आहेत, असे वातावरण भाजपच्या सायबर फौजा तयार करीत आहेत. या महान राष्ट्रीय कार्यासाठी त्यांनी आता मुंबईची निवड जाणीवपूर्वक केली असल्याची टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण आणि भाजपची भूमिका यावर सडकून टीका करण्यात आली आहे. घटनात्मक पदावर असलेल्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर फिरवणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याला स्वतः संरक्षणमंत्री फोन करुन धीर देत असतील तर राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, विद्यमान लष्करप्रमुख, नौदलप्रमुखांची बदनामी केली तर चिंता करु नका, असा खोचक सल्ला अग्रलेखात केंद्र सरकारला देण्यात आला आहे. तसेच मारहाणीसाठी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या माजी अधिकाऱ्याने चीन सीमेवर 20 जवानांच्या हत्येस जबाबदार धरुन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, असंही मत व्यक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियात व्हायरल करणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी अलीकडेच मारहाण केली होती. त्यावरून गदारोळ सुरू आहे. भाजपनं सरकारवर टीका सुरू केली आहे. शर्मा यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेनं शर्मा यांच्यासह भाजपचाही समाचार घेतला आहे. ‘शर्मा यांनी झालेल्या मारहाणीचं आम्ही समर्थन करत नाहीत, पण हे जे कोणी निवृत्त अधिकारी महोदय आहेत, त्यांनी राज्याच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल माध्यमांवर फिरवून काय मिळवले? घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कोणी शिकविले नव्हते काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. ‘ज्या राज्यात राहता, कमवता, सुखाने जगता त्या राज्यातील नेत्यांविषयी काहीही वेडेवाकडे बोलता व त्यावर संतापून कोणी तुमचे मुस्काट फोडले तर त्यास अन्याय, अत्याचार, स्वातंत्र्यावर घाला वगैरे शेलकी विशेषणे वापरून राजकारण करता, असंही सुनावलं आहे. खरंतर, या शर्मा यांनी सैनिकी पेशाला जागून लडाखच्या सीमेवर २० जवानांच्या हत्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती,’ अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. “एका नटीने मुंबईचा, मुंबई पोलिसांचा अवमान केला म्हणून त्याची चीड व्यक्त केली तर त्याला धमकी मानून तिला वाय प्लस अशी जोरदार सुरक्षा व्यवस्था हिमाचल आणि केंद्र सरकारने दिली. पण हिमाचलातील कांगरा भागात एका विवाहित महिलेवर सात जणांनी सामुदायिक बलात्कार केला. पुन्हा तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे दहशतीखाली जगणाऱ्या त्या अबलेस झेड सुरक्षा तेथील मुख्यमंत्र्यांनी, देशाच्या गृहमंत्र्यांनी द्यायलाच हवी होती. तसे का झाले नाही?” असाही सवाल विचारण्यात आला आहे.