कणकवली (वृत्तसंस्था) कृषी विधेयकावर संसदेत घेतलेल्या भूमिकेवरून ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है…’ असे म्हणत भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी महाविकास आघाडीला डिवचले आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नीतेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल कृषी विधेयकावर बोलले खरे, पण त्यांनी विरोध केला नाही. त्यांनी केवळ सभात्याग केला. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं कृषी विधेयकावरील भाषण तळ्यात-मळ्यात होतं. शिवसेनेला नेमकं कुठं जायचं आहे हे माहीत नाही. त्यांच्या नेतृत्वाला शेतीची काही माहिती नाही. त्यांचा पक्ष शेतीच्या प्रश्नावर कधीही भूमिका घेत नाही,’ असेही नीतेश राणे म्हणाले. दरम्यान, कृषी विधेयकावरील चर्चेसाठी शरद पवार राज्यसभेत उपस्थितच नव्हते असा दावा काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर आता नीतेश राणे यांनी पवार साहेब आमच्यासोबत असल्याचे चांगलाच संभ्रम निर्माण केला आहे.