नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आले, असे वक्तव्य शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांना विरोध दर्शवत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत असेही राऊत म्हणाले. आम्ही अद्यापही जुने संबंध विसरु शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्त्वाचा शेवटचा स्तंभ होतो, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. एनडीएत कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय तर सोडून द्या पण जर एनडीएमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय होत आहेत तर धोरणात्मक चर्चा झाली असती तर बरे झाले असत, असे मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच टीडीपीचे काही नक्की नसते, ते येऊन जाऊन असतात. फक्त शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधील सर्वात जुने, जाणते आणि निष्ठावान होते. बाकी नितीश कुमार येऊन जाऊन असतात. त्यांचे उद्याचे काही सांगू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत.