जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0 मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. जळगाव जिल्ह्यात 850 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून 153 उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार आहे. सध्या 68 मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या योजनेच्या कामांना लोकसंवाद व सहकार्यातून आणखी गती द्यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (29 जुलै) दिले.
जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. यावेळी लोकेश चंद्र बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे (प्रकल्प), सौर सल्लागार श्रीकांत जलतारे, मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी (जळगाव) यावेळी उपस्थित होते.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0 इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षात 16 हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा अभ्यास व अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राज्यस्थान या राज्यांतील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी येत आहेत.
जळगाव जिल्ह्यात 153 उपकेंद्राच्या ठिकाणी 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सध्या 14 उपकेंद्रांच्या ठिकाणी उपलब्ध जागांवर 68 मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या योजनेचे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून द्यावे. गैरसमजातून होणारे विरोध प्रबोधनाद्वारे दूर करावे. लोकसंवाद व सहकार्यातून या योजनेला गती देण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. तसेच सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन करणे व सौर प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा करण्याचे कामांना गती देण्यात यावी असे निर्देश लोकेश चंद्र यांनी दिले.
ग्रामसभेत सौर योजनांचा प्रसार करा– घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यवत करणारी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, मागेल त्याला सौर ऊर्जा कृषिपंप आदींची प्रभावी अंमलबजावणी करणे व त्याचा ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी ग्राहक संवाद व प्रबोधन करण्यात यावे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेद्वारे सौरग्राम योजनेला मोठे पाठबळ मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने या योजनेला आणखी गती द्यावी. स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांमध्ये या योजनेची माहिती द्यावी. गावागावांमध्ये प्रबोधन करावे अशी सूचना लोकेश चंद्र यांनी केली.