चोपडा (प्रतिनिधी) शिरपूर- चोपडा रस्त्यावरील काझीपुरा फाट्याजवळ अचानक रस्त्यात आलेल्या खड्ड्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडाला जाऊन आदळल्यामुळे भीषण अपघात घडला. सुदैवाने गाडीच्या चारही एअरबॅग उघडल्याने संपुर्ण कुटुंब वाचले आहे. अपघात इतका मोठा होता की, गाडीचे पुढचे चाक पूर्णतः वेगळे होऊन लांब पडले होते.
यासंदर्भात अधिक असे की, येथील जनसेवा हॉस्पिटलचे संचालक तथा आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला यांच्या वाहनाला रविवारी अपघात झाला. डॉ. चंद्रकांत बारेला हे पत्नी डॉ. सोनाली, मुलगा राजे, भाचा व शालक, त्याची पत्नी असे परिवारासह खासगी कामानिमित्त इंदूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान शिरपूर- चोपडा रस्त्यावरील काझीपुरा फाट्याजवळ अचानक रस्त्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडाला जाऊन आदळली. अपघात इतका मोठा होता की, गाडीचे पुढचे चाक पूर्णतः वेगळे होऊन लांब पडले. गाडीचा एक्सल तुटून, ड्रायव्हर साईडचे दोनही दरवाजे नुकसानग्रस्त होऊन ब्लॉक झाले होते. कारची अवस्था पाहून कारमध्ये बसलेले कोणीच बचावले नसल्याची शक्यता वर्तविली जाते.
गाडीची झाडाला दिलेली धडक आणि त्यामुळे उघडलेल्या चारही एअरबॅग या मुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. गाडीत ॲटो सिस्टिम असल्याने १०८ ला फोन लागला. घटनास्थळी ताबडतोब रुग्णवाहिका देखील पोचली. तोपर्यंत परिचयाच्या लोकांनी सर्वांना सुखरूप गाडीच्या बाहेर काढले होते. डॉ. सोनाली बारेला यांना डोक्याला किरकोळ मार लागला असून, त्यांनी प्राथमिक उपचार घेतला.