धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील गौतम नगर भागात आज सायंकाळी वादळी वाऱ्यानंतर विजेची तार पडल्याने एक गाय व म्हशीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत कपिल मोरे यांचे साधारण अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
या संदर्भात अधिक असे की, गौतम नगर परिसरातील कपिल मोरे यांनी आज नेहमी प्रमाणे आपली जाफराबादी म्हैस आणि जर्शी गाय अंगानासमोर बांधलेली होती. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास धरणगावात जोरात वादळी वारा सुरु झाला. याचवेळी अचानक महावितरणची विजेची तार अंगावर पडल्याने श्री. मोरे यांची एक गाय व म्हशीचा जागीच मृत्यू झाला. मोरे यांचे साधारण अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी माजी नगरसेवक दीपक वाघमारे यांनी भेट देत पोलीस प्रशासन, महसूल, महावितरण आणि पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यास मदत केली. वारावादळमुळे काही वेळ परिसरातील विद्युत पुरवठा प्रभावित झाला होता. परंतू काही वेळानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश आले होते.