जळगाव प्रतिनिधी | अल्पवयीन मुलांच्या मदतीने शहरातील मार्केट परिसरातून दुचाकींची चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी बाजारपेठ असल्याने याठिकाणी जिलह्यातील नागरिक खरेदीसाठ येत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हीच संधी साधत चोरट्यांनी शहरातील मार्केट परिसरातून दुचाकी चोरीचा धडाकाच लावला होता. हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक भवारी यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन रवाना केले होते. काही संशयित चोरीची दुचाकी घेवून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील कर्मचारी अमोल ठाकूर, भास्कर ठाकरे, सुधिर साळवे व योगेश पाटील यांना मिळाली होती.
सापळा रचून बसलेल्या पथकाने गोलाणी मार्केट परिसरातून संशयित शुभम भगवान चौधरी वय २५, मोईन मुक्तार मणियार वय १८, ओम सुरेश हटकर वय १८, तिघे रा. रिंगणगाव, ता. एरंडोल यांना शुक्रवार १२ जुलै रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. त्यांनी आपण दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरी केल्याची कबुली देत आठ दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी त्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.