जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक भाजी विक्रेता महिला ठार झाली आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नाबाई गणेश हिवाये (वय ४०, रा.लोहारा ता. पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे. पती व मुलासह ती लोहारा गावात भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होती. (केसीएन)दरम्यान मंगळवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास लोहारा येथून रत्नाबाई ह्या जळगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी घेण्यासाठी बापू भास्कर चौधरी यांच्या रिक्षा मधून येत होत्या. दरम्यान कुसुंबा गावाजवळ रिक्षा आली असताना विराज ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा पलटी झाली. यामध्ये रत्नाबाई या बाहेर फेकल्या जाऊन दिशादर्शक फलकाच्या खांब्याला त्यांचे डोके आदळल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. तर यावेळेस रिक्षा चालक बापू भास्कर चौधरी आणि रिक्षातील आणखी एक जण गणेश बाबुलाल जाधव (वय २८ रा. रोटवद तांडा ता.जामनेर) हे जखमी झाले. दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मयत यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.