अमळनेर (प्रतिनिधी) तुझ्याशी लग्न करून तुझी मुलगी सांभाळायला तयार म्हणत विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही २०२२ नंतरच्या कालावधीत घडली. याप्रकरणी आरोपी एकनाथ छबीलाल पाटील याच्याविरुद्ध मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०२१ मध्ये विवाहित महिला व एकनाथ छबीलाल पाटील (पवार) (रा. सोनवद ता. धरणगाव जि. जळगाव) यांची ओळख झाली. यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. माझे लग्न झालेले असून मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे व तुझी मुलगी सांभाळायला तयार आहे, असे सांगून विवाहित महिलेला विश्वासात घेऊन विवाहित महिलेवर खापरखेडा येथे अत्याचार केला. तसेच आरोपी एकनाथ याने त्याच्या मूळगावी सोनवद येथे महिलेला घेऊन गेला. येथेही महिलेला लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर त्याने अत्याचार केला. एकनाथ याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवल्यामुळे विवाहित महिलेने २०२२ मध्ये पती समाधान यांच्याकडून फरकती घेतली. त्यानंतर महिला व तिची मुलगी पुणे येथे एकनाथ सोबत ५ महिने एकत्र राहिले. ऑगस्ट २०२५ पासून पुन्हा खापरखेडा येथे राहायला आल्यावर विवाहित महिलेला गरोदर असल्यामुळे तिने आरोपी एकनाथला लग्न करण्यास सांगितले. मात्र, आरोपी एकनाथ आजपर्यंत लग्न करण्यास टाळाटाळ करत आहे. याप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एकनाथ पाटील (पवार) याच्याविरुद्ध मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.