जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या श्रावण झिपरु राठोड (वय ४०, रा. नितीन साहित्य नगर) यांना भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची घटना कुसुंबा गावाजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नितीन साहित्या नगरात श्रावण झिपरू राठोड हे वास्तव्यास असून त्यांचे किराणा दुकान आहे. दि. १२ रोजी ते (एमएच १९, डीपी २९९१) क्रमांकाच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्याकरीता जात होते. यावेळी कुसुंबा गावाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, ईएम १७७८) क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात राठोड हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर वाहन चालक हा तेथून पसार झाला. राठोड यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दि. १३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना हेमंत जाधव हे करीत आहे.