रावेर (प्रतिनिधी) आपली शेळी व गुरे चारण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालकावर वाघाने झडप घातली. यात बालक गंभीर जखमी झाला असून हा आज सकाळी थरार पालपासून बारा किमी अंतरावरील असलेल्या वन हद्दीतील कंपार्टमेंट नंबर ६१ मध्ये घडला.
पालपासून बारा किमी अंतरावरील असलेल्या वन हद्दीत शेळी चारण्यास गेलेल्या दहा वर्षीय बालकावर वाघाने हल्ला केला. यात तो बालक गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी पाल वन्यजीव वन हद्दीतील कंपार्टमेंट नंबर ६१ मध्ये घडली. मांजल येथील गुराखी दीपला माल्या बारेला (वय १०) हा मित्रासोबत दररोजप्रमाणे शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीत मोढ्याचार जंगलात गेले होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने आधी शेळीवर हल्ला चढवला. नंतर गुराखी दिपला बारेला याच्यावर हल्ला करत नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर गंभीर जखमी केले.
प्रकारानंतर सोबतच्या गुराख्यानी बघताच गावाकडे धाव घेत गावात जाऊन गावकऱ्यांना घडलेली घटनेबाबत सांगून बोलवून आणले. तोपर्यंत अतिशय जखमी करून वाघ पसार झाला होता. वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी दुचाकीवर तत्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी केले.
वडीलांनी बुटमध्ये आणून पाणी पाजले
दिपला बारेला याच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले. यावेळी त्याला पाणी पाजण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने वडील माल्या बारेला यांनी स्वतःच्या बुटात नाल्यातून पाणी आणून पाजले. यानंतर मुलाला जखमी अवस्थेत दुचाकीवर १२ किलोमोटर पाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.