बुलढाणा (वृत्तसंस्था) दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात खामगाव येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामगाव ते मेहकर मार्गावर घडली. हृदयद्रावक म्हणजे मदतीसाठी धावलेल्या नागरिकांजवळ ‘ये सपना है, या हकीकत…’ म्हणत त्याने प्राण सोडले.
खामगाव येथील डॉ. नावेद देशमुख यांचा मुलगा मोहंमद तलाहा देशमुख (वय ३२) हा मेहकरकडून दुचाकी ने येत होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास पाथर्डी गावाजवळील वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यानंतर दुचाकी दोन तीनवेळा उसळून रस्त्याच्या कडेला काही अंतरावर आदळली आणि दुचाकी खड्डयात कोसळली. यात तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूच्या काही क्षण आधी त्याने नागरिकांजवळ ‘ये सपना है, या हकीकत…’ म्हणत जीव सोडला. मोहंमद तलाहा हा पाथर्डी येथील रोशनशाह बाबा यांच्या दर्ग्यावर नियमित दर्शनासाठी येत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
















