धरणगाव (प्रतिनिधी) दि.०७ मार्च, २०२२ रोजी धरणगाव येथे सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने (भाजप वगळता) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदच्युत करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे, यासंदर्भात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आदी पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत तहसिल कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
तत्पुर्वी राष्ट्रपिता तात्यासाहेब ज्योतिबा फुले, छत्रपती आबासाहेब शिवराय, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर, भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकास माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना निवेदन सादर प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र वाघ यांनी उपस्थितांसमोर सांगितले की, राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुणे व औरंगाबाद येथील कार्यक्रमात भारताचे महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरू चाणक्य होते, कुळवाडीभूषण शिवरायांचे गुरू समर्थ रामदास होते त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यावर अश्लाघ्य भाषेत, हास्यमुद्रेने अश्लील शब्दात वर्णन केले आहे. खरे तर, छत्रपती शिवरायांचे खरे गुरू माँसाहेब जिजाऊ तर संत चळवळीतले तुकोब्बाराय, वैचारिक मौनी बाबा हे होते. राष्ट्रपिता फुले ९०० ओळींच्या पोवाड्यात लिहितात की, मासा पाणी खेळे गुरू कोण तयाचा असा स्पष्ट शब्दात उल्लेख करून कल्पित कथेला फोल ठरवले आहे. तरीही राज्यपालांनी समर्थ रामदास यांना गुरू सांगून खोटा इतिहास व महापुरुषांना बदनाम करण्याचा खोडसाळपणा केला आहे. याप्रकारची वक्तव्य केले जात असतील तर, अतिशय चुकीचे व निंदनीय आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. हे निवेदन देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोच करून आमच्या भावना कळवाव्यात असे राजेंद्र वाघ यांनी सांगितले.
निवेदन देतांना शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसचे माजी सचिव डी.जी.पाटील, भारत मुक्ती मोर्चा प्रदेश सचिव मोहन शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, कॉंग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष डॉ.व्ही.डी. पाटील, बहुजन नेते लक्ष्मणराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे सकल माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण माळी, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निंबाजी माळी, सचिव गोपाळ माळी, विश्वस्त विजय महाजन, ऍडव्होकेट शरद माळी, आर डी महाजन, हेमंत माळी, डिगंबर महाजन, सुखदेव महाजन, सुनील देशमुख, भैय्या महाजन, नाना महाराज आदींसह शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्ष विलास महाजन, नगरसेवक अजय चव्हाण, राष्ट्रीय किसान मोर्चाचे गोरखनाथ देशमुख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी, सद्दाम सय्यद, झुबेर कुरेशी, बुद्धिष्ट इंटरनेशनलचे निलेश पवार, काँग्रेसचे रामचंद्र माळी, विकास पाटील, विक्रम पाटील, सिताराम मराठे, राहुल रोकडे, गणेश महाजन, त्र्यंबक पाटील, देवानंद चव्हाण, सुनील लोहार, पंकज पवार, गोपाळ पाटील, पत्रकार बाळासाहेब जाधव, महेंद्र तायडे आदी उपस्थित होते. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन शिंदे यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना चाणक्य शिवाय, समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल? त्याचप्रमाणे महात्मा फुले व सावित्रीमाई यांच्याबाबत अश्लील शब्दात वक्तव्य केल्याबद्दल निषेध व्यक्त करितो व छत्रपती हे सर्वांचे गुरु आहेत, त्यांना कुणाला गुरु सांगण्याची गरज नाहीये तेच आमचं शक्तिपीठ आहे असे मोहन शिंदे म्हणाले.