जळगाव (प्रतिनिधी) शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवित व्यापाऱ्याने त्यामध्ये गुंतवणुक केली. मात्र ऑनलाईन ठगांनी हेमेंद्र राजेंद्र शर्मा यांना ५ लाख ९५ हजारांत ऑनलाईन गंडवले. ही घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जय नगरातील ओंकारेश्वर मंदीराजवळ हेमेंद्र राजेंद्र शर्मा हे व्यापारी कुटुंबासह वास्तव्याला आहे. राम इनव्हेस्टमेंट नावाच्या व्हॉटसअॅप गृपच्या माध्यमातून गृप अॅडमीन गुरूराम या नावाच्या व्यक्तीने हेमेंद्र शर्मा यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्के टमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शर्मा यांचा विश्वास संपादन करून त्यांनी टेकस्टार कं पनीचे शेअर खरेदी करण्यास सांगितले. त्यासाठी गुरूराम नामक व्यक्तीने त्यांनी टेकस्टार हे अॅप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगितले. त्यानुसार दि. ८ फेब्रुवारी २०२४ ते दि. ४ एप्रिल रोजी दरम्यान त्यांच्या खात्यातून एकुण ५ लाख ९५ हजार रूपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर त्यांना मुद्दल आणि नफा परत मिळाला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवारी २७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुरूराम नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.