धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना महावितरणकडून थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्याची विशेष मोहीम सुरु आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात साधारण ४०० कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे ग्राहकांना वीज बिल भरतांना कोणतीही सवलत किंवा हप्ते पाडून दिले जात नाहीय. दरम्यान, कोरोनाचा कठीण काळ लक्षात घेता वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. या परिस्थितीला तोंड देत आता कुठे तरी जनता सावरत आहे. पण, महावितरणकडून टाळेबंदीच्या काळातील वाढीव विजबिले देण्यात आली. सुरुवातीला सरकारने वीज बिल माफीच्या भूलथापा दिल्या. मात्र, वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सरकारला जनतेची अवस्था समजत नाही का?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. महावितरणकडून वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून देण्यात यावी. तसेच तोपर्यंत एकही कनेक्शन तोडले जाऊ नये, अशी मागणी जनतेतून होत आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सवलत देण्याऐवजी उलट शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची वीज तोडणी सुरू आहे. या विरोधात धरणगावकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सक्तीची वीज बिल वसुलीचा त्रास शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेला होत आहे. त्यामुळे वीज तोडणी तत्काळ थांबवा या मागणीसाठी भविष्यात आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीज महामंडळाने वीज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवले पाहिजे, अशी मागणी होत आहे.
सरकारला शेतकऱ्यांची अवस्था समजत नाही का?, लोकांना सध्या रोजगार नाहीय. दुसरीकडे शेतीच्या कामांची लगबग सुरु आहे. अशा काळात वीज कनेक्शन तोंडने प्रचंड संतापजनक बाब आहे. वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबली नाही. तर भाजपला रस्त्यावर उतरावे लागेल.
-अॅड.संजय महाजन (जिल्हाध्यक्ष भाजप ओबीसी आघाडी)
कोरोनामुळे राज्यात लाॅकडाऊन असून, तो अजून पूर्ण उठलेला नाही. अनेक छोट्या व्यावसायिकांची आर्थिक घडी सुरळीत नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे सक्तीची वीजबिल वसुली, कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवण्यात यावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. याबाबत लवकरच आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधणार आहोत.
-दीपक वाघमारे (जिल्हाउपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस )
धरणगावातील वीज तोडणी मोहीम बाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून दोन हप्त्यांमध्ये ग्राहकांना सुट देण्यात यावी अशी मागणी करणार आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल.
पप्पू भावे (पालिका गटनेते, शिवसेना)
कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यासायीकांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे विज बिल भरणे काही नागरिकांना शक्य होत नाहीय. त्यामुळे वीज कनेक्शन खंडित करणे महावितरण त्वरित थांबवले पाहिजे. यासंदर्भात आम्ही जिल्हा काँग्रेसतर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधणार आहोत.
चंदन पाटील (तालुका उपाध्यक्ष, कॉंग्रेस)
मागील १५ दिवससात साधारण ३५० ते ४०० कनेक्शन थकबाकी असल्यामुळे तोडण्यात आले आहेत. दिवसाला साधारण १५ ते २० वीज कनेक्शन तोडले जात आहेत. वीज बिल हप्त्यांमध्ये विभागणी करण्याची आम्हाला कोणतीही सूचना नाहीय. त्यामुळे संपूर्ण बिल भरने आवश्यक आहे.
एम.पी. धोटे (सहाय्यक अभियंता, महावितरण, धरणगाव)