धरणगाव (प्रतिनिधी) येथील एक वकिलावर गंभीर हल्ला झाल्याची घटना २३ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली आहे. अॅड. राहूल शांतीलाल पारेख यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून, त्यात वासुदेव उर्फ बाळा पाटील आणि वाल्मिक पाटील यांच्यासह ६ ते ७ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तक्रारदार अॅड. राहूल पारेख यांचा दावा आहे की, २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:४५ वाजता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना न्यायालयातील तारीख सांगितली. त्यावेळी एका अनावश्यक वादाची सुरूवात झाली आणि वाल्मिक पाटील यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तक्रारदार यांनी त्याला शांत होण्याची विनंती केली, परंतु ते हल्ला करीतच होते. यानंतर, वाल्मिक पाटील यांनी त्यांचा भाऊ वासुदेव पाटील यांना फोन करून तक्रारदारला मारहाण करण्यासाठी चिथावणी दिली. वासुदेव पाटील, ६ ते ७ अज्ञात व्यक्तींसह रात्री ८ वाजता तक्रारदाराच्या कार्यालयात घुसले. त्यांना अश्लील शिवीगाळ करत तक्रारदारला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर तक्रारदारांच्या कार्यालयात असलेल्या कारकुनांनी धाडसीपणे तक्रारदारला बचावले आणि कार्यालयाच्या दाराला लॉक करून हल्ला टाळला. परंतु, हल्लेखोरांनी कार्यालयातील संगणक, प्रिंटर आणि फर्निचरचे नुकसान केले आणि ४० हजार रुपये लुटले. जात असताना त्यांनी तक्रारदाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना घडल्यानंतर तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय घाबरले असल्यामुळे तक्रार देता आली नाही. मात्र, त्यांनी आज धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अॅड. पारेख यांनी म्हटले की, “भविष्यात जर माझ्या जीवनावर काही संकट आले, तर यासाठी वाल्मिक पाटील, वासुदेव पाटील आणि अन्य अज्ञात व्यक्तीच जबाबदार असतील. तसेच तक्रारदारांनी पोलीसांकडे सखोल तपासाची मागणी केली आहे आणि आरोप करण्यात आलेल्या सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी दिले पोलिसांना निवेदन !
धरणगावातील ॲड. राहुल पारेख यांच्या घरात घुसून तोडफोड तसेच सामानाची नासधूस केल्याचा प्रकार रात्री घडला होता. या प्रकरणाचा निषेध म्हणून आज धरणगाव न्यायालयात वकिलांनी काम बंद आंदोलन केले. तसेच धरणगाव पोलीस निरीक्षकांची भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. किरकोळ वादातून राहुल पारेख यांच्या घरात पाच ते सात जणांनी प्रवेश करत सामानाची तोडफोड केली होती. याप्रकरणी राहुल पारेख यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. तत्काळ गुन्हा दाखल झाल्यास उद्या जळगाव जिल्ह्यात सर्व वकील काम बंद आंदोलन करतील असा इशारा देखील दिला आहे.