जळगाव (प्रतिनिधी) जिल्हातील गुटख्यासह इतर अवैध धंद्यातून होणाऱ्या वसुलीतून पोलीस अधिकारी, राजकारणीसह आणखी कुणा-कुणाला हप्ते जायचे याची एक मोठी यादी तत्कालीन एलसीबी पोलीस निरीक्षक किरण बकालेने आपल्याला लिहून दिली असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दूध संघातील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यासाठी खडसे शहर पोलीस ठाण्यात मागील पाच तासापासून ठाण मांडून आहेत.
अधिवेशनात राजकारण्यांपासून तर सगळ्यांची नावं वाचून दाखवणार !
जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी (बटर) आणि दूध भुकटीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी गुरुवारी दुपारपासून शहर पोलीस ठाणे गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार खडसेंनी दूध संघातील विक्रीतील अपहार प्रकरणी अध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या मांडणार असल्याचा पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतांना जळगाव जिल्ह्यात सट्टा, पत्ता, दारू सर्रास सुरु असून गुटख्याच्या धंद्यात तर राजकीय व्यक्ती सहभागी असल्याचा आरोप खडसे यांनी केला. तसेच बकाले माझा मित्र होता. परंतू त्याने चुकीचे वक्तव्य केले होते, त्याचा निषेधच आहे. पण बकालेने मला गुटख्यासह इतर अवैध धंद्यातून होणाऱ्या वसुलीतून पोलीस अधिकारी, राजकारणीसह आणखी कुणा-कुणाला हप्ते जायचे याची एक मोठी यादी मला देऊन गेला आहे. कोणत्या आमदाराला, पुढाऱ्याला किती पैसे देतो?, गुटख्याचे, मटक्याचे धंदे कुणाचे आहेत, हे सगळं बकालेने मला लिहून दिलं आहे. येत्या अधिवेशनात या सर्वांची नावं मी वाचून दाखवणार असल्याचे खडसे यांनी सांगितल्यामुळे खळबळ उडाली आहे.
खडसे समर्थकांसह मागील पाच तासापासून ठाण मांडून
जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी (बटर) आणि दूध भुकटीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी गुरुवारी दुपारपासून शहर पोलीस ठाणे गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार खडसेंनी दूध संघातील विक्रीतील अपहार प्रकरणी अध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या मांडणार असल्याचा पवित्रा घेतला. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात समर्थकांसह ठिय्या दिला आहे. शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी आमदार खडसेंसह दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, दीपक फालक, वाल्मीक पाटील, योगेश देसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप
आमदार खडसे यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना चांगलेच धारेवर धरले. आधी साध्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असला, तरी आता आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. गैरव्यवहार प्रकरणातील संशयितांना फरार करण्यास तुम्हीच जबाबदार आहात. तक्रार दिल्यानंतर लगेच गुन्हा दाखल केला असता, तर संशयितांना अटक करता आली असती. दूध संघातील विक्रीतील गैरव्यवहार प्रकरणी वेळीच गुन्हा दाखल करण्यात न आल्यामुळे दोन्ही संशयित फरार झाले असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.