जळगाव (प्रतिनिधी) पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना विशेषत: ज्येष्ठांना लुटणारी टोळी जळगाव जिल्ह्यात सक्रीय असल्याचे मागील तीन घटनांवरून समोर आले आहे. धरणगावनंतर जळगाव आणि पाचोऱ्यात तर एकाच दिवसात पोलीस असल्याची बतावणी करून दोन वृद्धांकडून दागिने लांबविल्याचा प्रकार घडला आहे. (Jalgaon Crime News)
जळगावात आयएमआर महाविद्यालयाजवळ वृद्धाची फसवणूक !
स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कर्मचारी असल्याचे भासवून दोन चोरट्यांनी सेवानिवृत्त बीडीओ वसंत किसन साळूंखे यांची सोन्याची चेन व अंगठी लंपास केल्याची घटना दि. सोमवारी दुपारी ४ वाजता आयएमआर महाविद्यालयाजवळ घडली. साळूंखे हे गणेश कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. दुचाकीची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सोमवारी दुपारी ते आयएमआर महाविद्यालयाजवळील बॅटरी रिचार्ज सेंटरवर आले होते. तेथून पायी परतताना त्यांना एकाने रस्त्यात अडवून मी पोलिस असून स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी आहे.
शहरात खुप चोऱ्या होत असून दागिने सांभाळा असे म्हणाला. तेवढ्यात त्या व्यक्तीचा साथीदार दुचाकीवरून आला. त्या दोघांनी जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडील दागिने रुमालात ठेवले आणि वसंत साळूंखे यांनाही अंगठी व चेन आमच्याकडे द्या, असे सांगितले. साळूंखे यांनी सुध्दा अंगठी व चेन काढून त्या रूमालामध्ये ठेवली. नंतर त्या दोघांनी रूमाल गुंडाळून साळुंखे यांना देवून तेथून धूम ठोकली. काही मिनिटांनी साळूंखे यांनी रूमाल उघडून पाहिल्यानंतर त्यात दगड मिळून आल्यावर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. सायंकाळी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
पाचोऱ्यात वृद्धाच्या हातातील अंगठ्या लांबवल्या !
दि. ३० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन पाचोरा शहरातील सेवानिवृत्त वृद्धाच्या हातातील ३९ हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. शहरातील साने कॉलनीतील निवृत्त भीवराव भाऊराव पाटील (वय ७९) हे ३० रोजी दुपारी स्कूटीने गेले होते. दरम्यान १.३० वाजता खासगी कामासाठी एम. महाविद्यालयामागील दत्त कॉलनी परिसरातून जाताना विना नंबरच्या दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्तींनी भीवराव पाटील यांना असे सांगितले.
तुमच्या परिसरात फसवणुकीच्या व चोरीच्या घटना घडत आहेत, आम्हाला साहेबांनी पेट्रोलिंगसाठी पाठवले आहे, अशी बतावणी करून त्यांच्याजवळील लाल रंगाचा हातरुमाल काढून भीवराव पाटील यांच्या हाताच्या बोटातील ३० हजारांची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ९ गुरुजी हजारांची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी अशा दोन अंगठ्या रुमालात बांधण्याचे नाटक केले. त्यानंतर हा रुमाल पाटील यांच्याकडे देत दोघांनी पोबारा केला. काही एम. वेळानंतर पाटील यांनी रुमाल पाहिला असता त्यात अंगठ्या आढळल्या नाहीत. त्यानंतर भीवराव पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
धरणगावातही वृद्धाची अशाच पद्धतीने फसवणूक !
छगन सखाराम खैरनार (वय 73,रा. कमलनगर, एरंडोल, धरणगाव) हे दि. 17 जानेवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घराचे लाईटबील भरण्यासाठी स्कुटीवरून शहरातील बालाजी पतपेढी येथे आले होते. लाईटबील भरणे झाल्यानंतर 11 वाजेच्या सुमारास स्कुटीने घरी परत जात असतांना शहरातील किकाभाई बोहरा यांच्या बंगल्यासमोर दोन अनोखी मोटारसायकलस्वार यांनी त्यांची दुचाकी थांबवली. तसेच आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी केली.
भामट्यांनी खैरनार यांना विचारपुस केली की, तुमच्याकडे गांजा आहे काय?. यानंतर दोघं भामट्यांनी श्री. खैरनार यांच्या दुचाकीची डीक्की उघडण्यास सांगितले. यानंतर दोघं भामट्यांनी खैरनार यांच्या हातातील रुमाल व हातातील अंगठी खिशात घाला, असे सांगीतले. घाबरून खैरनार यांनी हातातील अंगठी काढून खिशात घालण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, भामट्यांनी हातचलाखीने अंगठी लंपास केली. यानंतर खैरनार यांच्या लक्षात येईपर्यंत दोघे मोटर सायकलने निघून गेलेले होते. खैरनार यांनी दोघांचा पाठलाग केला. परंतू ते मिळून आले नाहीत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धरणगाव पोलिस करत आहेत. दरम्यान, संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
वृद्धांची फसवणूक करणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय !
धरणगाव, जळगाव आणि पाचोरा येथील घटना लक्षात घेता दोन भामट्यांची जिल्ह्यात टोळी सक्रीय असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरासह ग्रामीण भागात काही तोतया साध्या वेशात पोलिस असल्याची बतावणी करून लुटपाट करण्याच्या हेतूने हे भामटे सक्रिय आहेत. विशेष म्हणजे ही टोळी वृद्ध महिलांना व पुरुषांना लक्ष्य करतात. त्यांची लुटण्याची पद्धत वेगळी असून ते पोलिस असल्याची बतावणी करतात. शहरात दंगा झाला आहे, लुटपाट सुरू आहे, चोरांची टोळी आली आहे, असे सांगून घरातून एकट्याने बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अंगावरील दागिने काढून रुमाल किंवा थैलीत बांधून घ्या, नाही तर कुणीतरी तुमचे दागिने लुटून नेईल, असे सांगून लुटण्याची यांची पद्धत आहे. दरम्यान या टोळीतील दुसरा सहकारी पोलिस असल्याची बतावणी करीत विश्वास संपादन करत हे दागिने थैलीत ठेवताना हातचलाखी करत घटनास्थळावरुन पळ काढतात.
तत्काळ पोलिसांना सूचित करा
शहरात यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. त्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. कोणतेही पोलिस अधिकारी व कर्मचारी महिला व पुरुषांना त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास सांगत नाहीत. अनोळखी व्यक्तीने पोलिस असल्याचे बतावणी करून दागिने काढण्यास सांगीतले असल्यास तत्काळ ११२ या क्रमांकावर पोलिसांना सूचित करावे किंवा घटनास्थळी असणाऱ्या परिचित व्यक्तीला बोलावून घेत या बाबत पोलिसांना माहिती द्यावी.