जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुनील झंवरच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत पोलिसांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना दोन वेळेस करोडो रुपये दिल्याचा हिशोब लिहिलेले दोन कागदपत्रे सापडली असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, झंवरकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्कमध्ये देखील आ. चव्हाणांसोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे दोघांचा आर्थिक व्यवहाराचा उद्देश काय?, याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात दिलीय. दरम्यान, यामुळे आता आ.चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन वेळेस करोडो रुपये दिल्याची नोंद
जळगाव सुनील झंवरच्या कार्यालयात केलेल्या छापेमारीच्या वेळेस अनेक कागदपत्रासह एक डायरी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला सापडली होती. या डायरीत साधारण २२१ कोटीचा हिशोब आहे. हा हिशोब जमा आणि खर्च असा दोन विभागात लिहिला गेला आहे. तर दुसरीकडे सापडलेल्या कागदपत्रांमध्ये ८ ते १० स्वतंत्र कागदं आहेत. त्यावर नावानिशी कुणाला किती पैसे दिले याची नोंद आहे. यात एका कागदावरील नोंदीत १ कोटी ५५ लाख आणि दुसऱ्या कागदावरील नोंदीत ४ कोटी ५० रुपये आ. चव्हाण यांना दिल्याची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे या कागदपत्रांमध्ये जिल्ह्यातील अनेक बड्या राजकीय लोकांना देखील दिलेल्या पैशांचा हिशोब असल्याचे कळते.
नऊ महिन्यांपासून आ.चव्हाण करताय माहितीसाठी पत्रव्यवहार
गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या या गुन्ह्यातील तपासाबाबत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव व पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून बरीच माहिती मागितली आहे. गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आला, व्याप्ती किती, आणखी कोणाचा समावेश आहे. झंवर, कंडारे यांच्या घराबाहेर पोलिस गार्ड कोणी लावले, जळगावात छापेमारी करण्यासाठी आलेले पोलिसांचे पथक कोणत्या हॉटेलात थांबले? अशा प्रकारची माहिती चव्हाण यांनी वेळोवेळी विचारली आहे. यातील गोपनीय माहिती वगळता इतर माहिती पोलिसांनी त्यांना दिली आहे. एवढेच नव्हे तर आमदार चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून पोलिसांचे वाहन क्रमांक, प्रवासासाठीचा भत्ता, सरकारी वकिलांची नियुक्ती अगदी फोरेन्सिक लॅबकडे देखील आ.चव्हाण यांनी माहितीसाठी पत्रव्यवहार केला आहे.
पत्रव्यवहार तसेच आर्थिक व्यवहाराचा काय उद्देश? याचा होणार तपास
आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या या प्रकारामुळे तपासात अडचणी निर्माण होत आहेत. चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याची नोंद झंवरकडे मिळून आलेल्या हार्डडिस्कमध्ये आहे. त्या अनुशंगाने चव्हाण यांचा पत्रव्यवहार करण्याचा तसेच आर्थिक व्यवहाराचा काय उद्देश आहे? याचा तपास करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस, सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली आहे. यामुळे आ.चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारी पक्षाने न्यायालयात दिलेली माहिती आणि झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये लिहिलेल्या हिशोबाच्या बाबतीत आ. मंगेश चव्हाण यांच्याशी दोन वेळेस संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
विजय वाघमारे (9284058683)