जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराची माहिती उघड होऊ नये, म्हणून सन २०१५ पासून तर आजतागायत जाणीवपूर्वक लेखापरीक्षण केले नसल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पतसंस्थांचे सनदी लेखापाल धरम साखला (टॅक्स ऑडिटर आणि संस्थेच्या जळगाव शाखेचा कर्ज सल्लागार समिती सदस्य) व त्याचा भाऊ योगेश साखला हा अंतरलेखा परीक्षक होते. त्यामुळे त्यांना पतसंस्थेच्या सर्व व्यवहारांची इत्यंभूत माहिती होती. सदर पतसंस्थेवर २०१५ ऑक्टोबर मध्ये आरोपी जितेंद्र कंडारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली व नंतर २०१६ मध्ये जितेंद्र कंडारे याचीच सदर संस्थेवर अवसायक म्हणून नियुक्ती झाली. सदर संस्थेच्या मालमत्ता, बेनामी ठेवी मोठमोठ्या करण्याच्या नावाखाली संस्थेतून दिलेला पैसा याबाबतची माहिती दोघांनी जितेंद्र कंडारे याला देत त्याला सतत गुन्हा करण्यात सहाय्य केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच महावीर जैन हे कर्जदारांच्या कर्ज प्रकरणांमध्ये हेराफेरी करून सरळ व्याज दराच्या नावाखाली रक्कम कमी केल्याचे दाखवत व त्यास धरम साखला, योगेश साखला, जितेंद्र खंडारे, प्रकाश वाणी, सुजित वाणी हे मदत करायचे. तसेच कुणाल शहा कडून नवीन सॉफ्टवेअर तयार करून त्यात, पाहिजे त्यावेळी मागील तारखेचे अथवा हवा तसा बदल करून या आरोपींनी गैरव्यवहार केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.