जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करत अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेला धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. एवढेच नव्हे तर, फेसबुक पेजला कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के यांचे लिंक असलेल्या क्रेडिड कार्डमधून ७० हजार काढून फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात गोपाल शिवाजी म्हस्के (रा.टाकळी प्र.चा. ता. चाळीसगाव) यांनी याबाबत जळगाव सायबर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मिडीयावरील फेसबुक अकाऊंट “Mangesh Chavan” व फेसबुक पेज “Mangesh Chavan-मंगेश चव्हाण” हे हॅक केले. त्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून त्यावर काळा बुरखा (कपडा लपटलेला) चेहरा व हातात चाकु घेतलेले व्यक्तीचा धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट देखील डिलीट केल्यात. एवढेच नव्हे तर, Mangesh Chavan-मंगेश चव्हाण या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडीट कार्डमधून ओ.टी.पी. न घेता ७० हजार ८०० रुपये काढून आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाभर कानडे हे करीत आहेत.