मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांसाठी आता नवी यादी पाठवण्यात येणार असून त्यामधून एकनाथराव खडसे, राजू शेट्टी आणि इतर राजकीय नेत्यांची नावं वगळण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यात ही नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची शिफारस करुन दीड वर्षे झाली तरी त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवी यादी राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी असणारे एकनाथराव खडसे आणि राजू शेट्टी तसेच इतर नावं वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव बाजूला पडणार आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आगामी निवडणुकीत संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. तर राजू शेट्टी यांनी आधीच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून आपलं नाव या यादीतून वगळावं यासाठी त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शरद पवारांनी पंतप्रधानांकडे राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न उपस्थित केला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या 12 सदस्यांच्या नावाची यादी कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आली होती आणि नंतर ती राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. पण गेल्या दीड वर्षांपासून ही यादी राज्यपालांच्या कार्यालयातच पडली असून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.