जळगाव (प्रतिनिधी) आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्येही आता बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्कालीन फडणवीस सरकारने राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता. तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर हा निर्णय रद्द केला होता. नुकताच याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर झाला होता. दुसरीकडे न्यायालयाने कोरोनाचे कारण देऊन निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली होती. या निवडणुका वेळेत घ्यावयाच्या असल्यास नवीन पध्दतीत प्रभाग रचनेसाठी वेळ लागेल. यामुळे ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने आधीप्रमाणेच बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. दरम्यान, महापालिकेत तीन तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पध्दती होती. परंतू आजच्या बैठकीत बहु सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच म्हटले आहे. त्यामुळे नगरपालिकेत दोन सदस्यीय राहते की, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील चार सदस्यीय पद्धत राहते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.