जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील धानवड येथील शेतकरी कुटुंबियांच्या घराची कडी-कोयंडा तोडून घरातून ३५ हजारांची रोकड, मोबाईलसह एकूण ४५ हजारांचा ऐवज भरदिवसा लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, धानवड येथील शेतकरी कैलास नारायण पाटील (वय ३९) पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कैलास पाटील हे त्यांची पत्नी दोन्ही मुलांना सोबत घेत नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दोन दरवाजांच्या घराचा समोरील दरवाजा बाहेरुन कुलूप आणि मागील दरवाजाला आतून कडी लावली होती. चोरट्यांनी मागील दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरातील वेगवेगळया डब्यात ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड, ८ हजार रुपयांचे हातातील कडे, व २ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास कैलास पाटील हे घरी परतले. घडला प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक गफ्फार तडवी हे करीत आहेत.