चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातून तलवारी घेऊन जाणाऱ्या जळगाव येथील दोघा भावांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरातील गीता वाडीजवळील ऑटोनगरच्या प्लॉट क्रमांक १६ मध्ये राहणारे हर्षल सुनील परदेशी व जयेश सुनील परदेशी हे दोघे भाऊ चाळीसगाव शहरातून अवैधरित्या तलवार घेऊन जात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून पो. नि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पो.उ.नि. संदीप घुले, पोलीस हवालदार योगेश बेलदार, पोलीस नाईक नितीन आगोने, नीलेश पाटील, महेंद्र पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील यांनी सापळा रचला. आणि पाटणादेवी चौकातील दशमा रसवंतीगृह जवळ हर्षल व जयेश परदेशी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून तीन तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश बेलदार करत आहेत.