जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून रखडल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. दरम्यान, आज जिल्हा प्रशासनाकडून गट- गणांची प्रारूप रचना जाहिर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात एक गट कमी तर दोन गट वाढले आहे. जिल्ह्याची गटसंख्या ही ६८ करण्यात आली असून गणांची संख्या देखील १३६ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ६८ गटांचे सदस्य निवडून येणार आहेत. विषेश म्हणजे गट-गणांमध्ये मोठे बदल झाले असून गावांमध्ये उलटफेर झाले आहे. त्यामुळे हरकतींसाठी आता सहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले असुन निवडणुक पुर्वी प्रशासकीय कामकाजाचा पहिला टप्पा प्रारूप गट-गण रचना जाहिर झाल्याने सुरू झाला आहे. शासनाने १८ ऑगस्टपर्यंत गट व गण रचना पुर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
गटांसह गावांमध्ये उलटफेर; गणित बदलणार
गट व गणांसाठी निवडणुक आयोगाने २०१७ च्या निवडणुकांचे निकष कायम ठेवले आहे. त्यानुसार गटांतील मतदार संख्या ४० हजार तर गणांतील मतदार संख्या २० हजार पर्यंत ठेवण्यात आल्याने गटांच्या गावात उलटफेर झाला आहे. विषेश म्हणजे अनेक गटांची नावे बदलली असुन गावांमध्ये देखील उलटफेर झाले असल्याने आता राजकीय गणिते व समिकरणे देखील बदलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नशिराबाद गट ‘कट’ भादलीला अनेक गावे जोडली
जळगाव तालुक्यात नशिराबाद नगरपंचायत झाल्याने नशिराबाद गट आता भादली-कुसुंबा झाला असुन त्या गटात असोदा व शिरसोली गटाची काही गावे जोडण्यात आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात मुक्ताईनगर-निमखेडा गट कमी झाला असुन त्यात गटातील गावे अन्य दोन गटांमध्ये जोडण्यात आली आहे. जामनेर तालुक्यात शेंदुर्णी नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे त्या गटातील गावे अन्य गटांमध्ये जोडण्यात आली आहे.
अमळनेर, चाळीसगावात गट बदलले
चाळीसगाव तालुक्यात यापुर्वी ७ गट व १४ गण होते. मात्र यात एक गट व गण वाढला आहे. तर अमळनेर तालुक्यात देखील ४ गट व ८ गण होते. यात देखील १ गट व एक गण वाढला आहे. त्यामुळे पुर्वीच्या गटांमधील गावांमध्ये उलटफेर झाला आहे.
मुक्ताईनगरचा एक गट कमी
मुक्ताईनगर तालुक्यात या पुर्वीच्या २०१७ च्या निवडणुकीत ४ गट व ८ गण होते. मात्र नविन रचनेनुसार ३ गट व सहा गण होणार आहे. मुक्ताईनगरमध्ये ग्रामिणचा काही भाग नगरपंचायतीला जोडला गेला असल्याने येथे एक गट कमी झाल्याचे मानले जात आहे.
अमळनेर, चाळीसगावला एक गट वाढला
नविन रचनेनुसार जिल्हयात एक गट वाढणार आहे. त्यात अमळनेर तालुक्यात गेल्या निवडणुकीत चार गट होते. आता तेथे पातोंडा दहिवद या एक गटाचे दोन गट झाले आहेत. आता तालुक्यात पाच गट होणार आहे. तसेच पंचायत समितीच्या दोन गणांची देखील वाढ होणार आहे. तसेच या पुर्वी चाळीसगाव तालुक्यात ७ गट होते. आता एक घोडगाव हा गट वाढून ८ गट होणार असुन २ गणांची देखील वाढ होणार आहे.
१८ ऑगष्टला अंतिम रचना
गट व गणांची प्रारूप रचना जाहिर झाल्याने आता २१ जुलै पर्यंत हरकतीला वेळ देण्यात आला आहे. अंतिम गट रचना १८ ऑगष्ट रोजी अंतिम केली जाणार आहे.
आता ईच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष
जिल्हा परिषदेच्या ६८ गट व १३६ गणांची अंतिम रचना १८ऑगष्टला जाहिर होईल. मात्र आता महत्वपुर्ण टप्पा पार पडल्यानंतर आता सर्व इच्छुकांकडून आता आरक्षणाची प्रतिक्षा आहे. आरक्षण जाहिर झाल्यानंतरच ईच्छुकांसाठी चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा अंदाज आता पासून लावला जात आहे. कोणत्या गटात व गणात या पुर्वी कोणते कोणते आरक्षण होते? आता लोकसंख्येच्या निकषावर कोणते आरक्षण निघेल याचे आडाखे बांधले जात आहे.
चोपडा तालुक्यात सर्व गट बदलली
चोपडा तालुक्यात पुर्वीच्या विरवाडे गटात काही गावांमध्ये बदल झाले आहे. तर अन्य ४गटांमध्ये तर मोठा उलटफेर झाला असुन गणितेच बदलली आहे. गट व गण या दोघांची रचना अन्य गट, गणांशी जोडल्याने चोपडा तालुक्यात सर्वाधिक बदल झाल्याचे दिसते. रावेर तालुक्यात देखील गटांच्या गावांमध्ये बदल झाला आहे.