नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. या दौऱ्यात ते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेसला राज्यात एक नंबरचा पक्ष बनविणार, यासाठी वाटेल ते कष्ट घेईल, असा निर्धार नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रं हाती घेतल्यानंतर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड करण्यात आली असून नुकतीच त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीनंतर नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. २०२४ पर्यंत आपण हे लक्ष्य गाठणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्लीत एएनआयशी बोलताना सांगितलं की, “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर मी सोनियाजी आणि राहुलजी यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्रात पक्ष पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२४ पर्यंत हे लक्ष्य पूर्ण करु असा मला विश्वास आहे”.
“राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. मोदींनी काहीही बोललं तरी तो कायदा होतो पण दुसऱ्याने काही बोललं तर तो राष्ट्रद्रोह होतो. इंग्रज आणि मुघलांनी जेवढे अत्याचार केले नाहीत तेवढे अत्याचार आताचं विद्यमान सरकार शेतकऱ्यांवर करत आहेत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
काँग्रेस राज्यातील नेतृत्व बदलणार असल्याची चर्चा होती. नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसनं राज्यात प्रतिनिधीही पाठवले होते. यात अनेक नावं स्पर्धेत होती. काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ नेते असल्यानं त्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व निवडण्याचं आव्हान काँग्रेससमोर होतं. महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी गढ असलेल्या विदर्भात काँग्रेस कुमकुवत झाली असून, पुन्हा पाय रोवण्यासाठी विदर्भाकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचं बोललं जात आहे.