जळगाव (प्रतिनिधी) जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर चार महिन्यांपासून आयसीयूत अथवा ऑक्सिजनवर रुग्ण जाण्याची वेळ आली नव्हती. मात्र, तिसरी लाट सक्रिय झाल्यापासून बुधवारी प्रथमच आयसीयूत चार रुग्ण दाखल होण्याची वेळ आली आहे.
जळगाव जिल्ह्यात बुधवारी ४६९ रुग्ण नव्याने आढळून आले. शिवाय, आयसीयूतही चार रुग्णांना दाखल करावे लागले असून, सध्या ११ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या दोन हजार ८६८ झाली असून, त्यापैकी ६१ रुग्णांमध्येच लक्षणे आहेत. उर्वरित दोन हजार ८०७ रुग्ण लक्षणे विरहित आहेत.
चाचण्या वाढल्या
जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून रुग्णवाढ होत असताना चाचण्या त्या प्रमाणात वाढल्या नव्हत्या. बुधवारी मात्र चाचण्यांमध्ये वाढ झाली. आरटीपीसीआर व ॲन्टिजेन मिळून बुधवारी तीन हजार ९९२ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४६९ नवे बाधित समोर आले. चाचण्यांच्या तुलनेतील संसर्गदर दहा टक्क्यांपेक्षा अधिक असून, आयसीयूत रुग्ण आल्यानंतर आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
















