धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील लहान माळी वाडा परिसरातील राहणाऱ्या एका बांधकाम मजुराचा आज कंडारी गावी स्लॅब भरताना अचानक मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. दरम्यान, हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे बोलले जात आहे. बापू दयाराम पाटील (वय ४५) असे मयत बांधकाम मजुराचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, बांधकाम मजुर असलेले बापू पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत कंडारी गावी स्लॅब भरण्यासाठी आज सकाळी नेहमी प्रमाणे गेले होते. दिवस भर काम केल्यानंतर दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास बापू पाटील यांची प्रकृती अचानक खराब झाली. सहकारी मित्र असलेल्या बांधकाम मजुरांनी त्यांना तात्काळ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, बापू पाटील यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे बोलले जात आहे. परंतू याबाबत प्रशानाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. मयताच्या पश्चात दोन मुलं असल्याचे कळते.
उष्माघाताचा त्रास झाल्यास काय कराल ?
उष्माघाताची परिस्थिती उद्भवल्यास सर्वप्रथम व्यक्तीला सावलीत किवा थंड ठिकाणी न्यावे. तसेच शरीर ओले करून, पंखा सुरु ठेवावा. शॉवर दिल्यास अधिक चांगले होईल. पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे, दिवसभर ही सवय पाळावी.