जामनेर (प्रतिनिधी) डोक्यावर कर्ज, मुलींच्या शिक्षणासाठी पैशांची चणचण…तशात सख्ख्या नातेवाईकाकडून फसवणूक झाल्यामुळे हताश झालेल्या एका शेतकऱ्याने गोंदेगाव धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. संतोष सुरेश मराठे (४७, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी संतोष हे शेंदुर्णी येथे परिवारासह वास्तव्यास होते. संतोष यांचे वडील सुरेश मराठे व मावसा वसंत बागुल (६५, रा. खेडी बुद्रुक, ता. जि. जळगाव) या दोघांनी सन २००० मध्ये खेडी बुद्रुक शिवारात १५ हजार स्क्वेअर फूट जागा घेतली होती. बागुल यांना मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी सुरेश मराठे यांच्यासोबत घेतलेली काही जागा विक्री काढली.
दोघांमध्ये सव्वाचार लाखांचा सौदा झाला होता. जागेपोटी मराठे यांनी बागुल यांना ३ लाख रुपये दिले होते. उरलेले १ लाख २५ हजार देऊनही बागुल हे जागा मराठे यांच्या नावावर करीत नव्हते. या वादामुळे सुरेश यांना मुलगा संतोष यास त्याच्या हिश्शाची रक्कम देता येत नव्हती. यातच संतोष यांनी पतसंस्थेकडून कर्ज काढले होते. मुलींचे शिक्षण कसे करावे? यांची चिंता देखील संतोष यांना सतावत होती. या नैराश्येतूनच १४ जुलै रोजी संतोष यांनी गोंदेगाव धरणात उडी घेत जीवन संपविले. याबाबत पंकज मराठे यांनी फिर्याद असून त्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसंत बागुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याबाबतचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिले आहे.