धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात धरणगाव न्यायालयाने आज आरोपीला एका वर्षाची शिक्षा सुनावली. रविंद्र झिंगा चौधरी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तालुक्यातील एका गावात २०१८ मध्ये रात्री महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी रविंद्र चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीनंतर सर्व साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारावर धरणगाव न्यायालयाचे न्या. अविनाश ढोके यांनी आज आरोपी रविंद्र चौधरी यास विविध कलमात शिक्षा सुनावली. त्यानुसार कलम ३५४ मध्ये एक वर्षाची शिक्षा आणि हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एका महिन्याची साध्या कैदेची शिक्षा, ४५२ मध्ये एक वर्ष शिक्षा, हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास आणि ५०६ मध्ये ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा अधिकची भोगावी लागणार आहे. दरम्यान, आरोपीला सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. सरकार पक्षाकडून हटकर मॅडम तर बचावपक्षाकडून सी.झेड. कट्यारे यांनी कामकाज बघितले.