धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट मद्य निर्मिती प्रकरणातील अटक केलेल्या चौघांची आज व्हिसीद्वारे सुनवाई झाली. यावेळी कोर्टाने चौघांना १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवून दिली.
चौघांना १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
भुपेंद्र गोकुळ पाटील (वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव), कडु राजाराम मराठे (वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव), भास्कर पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव) या तिघां संशयित आरोपींची १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दरम्यान, वरील तिघां संशयित आरोपींसह सचिन मधुकर पाटील (वय ४२ वर्ष रा. भवानी मंदिराच्या मागे शाम कॉलनी पाळधी ता. धरणगाव) याची देखील आज धरणगाव न्यायालयात व्हिसीद्वारे सुनवाई झाली. यावेळी न्यायालयाने सर्वांची १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवून दिली. दरम्यान, दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ गौतम माळीसंपर्कातील चौधरी नामक एका व्यक्तीला धरणगावातून ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. फोन रेकॉर्डवरून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या वृत्ताला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा जावरे यांनी दुजोरा दिला आहे.
‘मास्टर माइंड’ गौतम माळी गुजरात पोलिसांच्या ताब्यात
अटकेतील आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीला (वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव) याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बनावट मद्य प्रकरणातील ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीचा ताबा घेण्यासाठी मागील चार दिवसापासून धरणगावात गुजरात पोलिसांच्या दोन पथकं ठाण मांडून होते. गौतमवर गुजरातमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे आहेत.