धरणगाव (प्रतिनिधी) येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्यंगचित्रकार प्रा.बी.एन. चौधरी यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल स्टोरीमिरर या वेबपेजद्वारा त्यांना “साहित्य कर्नल” या बहुमानाने सन्मानीत करण्यात आले. स्टोरी मिररच्या संस्थापिका बिभू दत्ता-राऊत यांनी एका पत्राद्वारे प्रा. चौधरी यांना निवडीबद्दल कळविले आहे. साहित्याचा प्रसार करण्याकामी स्टोरी मिररमध्ये जे साहित्यिक आपले योगदान देतात त्यांना या बहुमानाने सन्मानीत करण्यात येते.
प्रा.बी.एन.चौधरी हे येथील शतकमहोत्सवी पी.आर. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आहे. ते मराठी साहित्यात खान्देशातील एक चर्चित व्यक्तीमत्व असून कथा, कविता, गझल, अभंग, समिक्षा आणि व्यंगचित्रकलेत त्यांचे मोठे योगदान आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते व्यंगचित्रकलेतील “मार्मिक” पुरस्कार मिळवणारे ते खान्देशातील एकमेव व्यंगचित्रकार आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या २०२१ च्या आॅनलाईन विश्व मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी सहभाग नोंदविला असून, संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी आणि संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितीज पाटुकले यांनी सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव केला आहे. प्रा. चौधरी यांच्या साहित्य क्षेत्रातील या सन्मानांबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.