
जळगाव, (शहाबाज देशपांडे) : वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श घालून देत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक उडान एनजीओला सदिच्छा भेट दिली. दिव्यांग बालकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या या संस्थेच्या उपक्रमांची त्यांनी यावेळी सविस्तर माहिती घेतली.
भेटीदरम्यान संस्थेच्या संचालिका सौ. हर्षाली चौधरी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी संस्थेकडून राबविण्यात येणाऱ्या सेवाभावी कार्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मनापासून कौतुक केले.
यानंतर जिल्हाधिकारी घुगे यांनी दिव्यांग बालकांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सहवासात घालवलेले आनंदाचे क्षण, बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आपुलकीचे वातावरण यामुळे हा वाढदिवस अधिक संस्मरणीय ठरला.
















