नागपूर (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात पोहोचले. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थान तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापे टाकले. यावेळी पोलिसांचा प्रचंड ताफा ईडी अधिकाऱ्यांसोबत होता. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले होते. या छाप्यानंतर लवकरच देशमुख यांच्याकडेही ईडीचे अधिकारी झाडाझडती घेण्याची शक्यता बळावली होती. त्या अनुषंगानेच ही कारवाई आहे.
१०० कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. त्यानंतर या प्रकरणात ईडी सक्रिय झाली. ईडीने गुन्हा दाखल केला. २५ मे रोजी ईडीच्या तीन पथकांनी अंबाझरीतील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक व गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे छापे टाकले. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.