
भुसावळ (प्रतिनिधी) – पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून, भुसावळ शहरात भामट्यांनी एका ६५ वर्षीय वृद्धाला लक्ष्य करीत तब्बल ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे भासवून वृद्धाला बोलण्यात गुंतवले आणि मोठ्या चलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन व अंगठी काढून घेत पोबारा केला. गुरुवारी दुपारी वसंत टॉकीज परिसरात ही घटना घडली.
रवींद्र गोविंदा बारी (वय ६५, रा. लक्ष्मीनगर, वांजोळा रोड, भुसावळ) हे गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता वसंत टॉकीजजवळून जात होते. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडविले. आपण पोलीस असल्याचे सांगत त्यांनी वृद्धाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगितले. भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने वृद्धाची फसवणूक झाली आणि आरोपींनी संधी साधून दागिने लंपास केले.
यामध्ये ९ ग्रॅम वजनाची अंदाजे ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन तसेच ५ ग्रॅम वजनाची बदाम चिन्ह असलेली अंदाजे २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, असे एकूण ७० हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले.
या प्रकरणी रवींद्र बारी यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन नायमाने पुढील तपास करीत आहेत.
















