
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिवकॉलनीजवळील हॉटेल मातोश्री समोर ड्रग्जची विक्री करणाऱ्या कल्पेश सतिष रायसिंग (वय २६, रा. शदर्णी, ता. चोपडा) याच्या रामानंद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ५ ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास केली. ड्रग्ज विकरणारा कल्पेश याने पुणे येथून अभियांत्रीकीचे शिक्षण पुर्ण केले असून तो उच्चशिक्षीत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.
शहरातील एमडी ड्रग्जचे जाळे
दिवसेंदिवस वाढत असून महाविद्यालयीन तरुणांसह अनेक जण ड्रग्जच्या विळख्यात अडकत चालले आहे. दरम्यान, शिवकॉलनीजवळील मातोश्री हॉटेल्स समोर काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेला इसम हा ड्रग्ज तस्करीसाठी आल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर त्यांनी तात्काळ उपनिरीक्षक संजय शेलार, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी, जितेंद्र राठोड, उमेश पाटील, योगेश बारी व योगेश ठाकुर यांचे पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांना देत होता उडवाउडविची उत्तरे
माहितीच्या आधारावर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पथकाने परिसरात सापळा रचला. यावेळी हॉटेल समोर (एमएच १९, सीसी ५०१६) काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक संशयित बसलेला होता. पोलिसांनी संशयिताची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव कल्पेश रायसिंग (वय २६, रा. शेंदणी वालकी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे सांगितले. सुरुवातीला त्याने झडती घेण्यास नकार दिला व उडवाउडवीची उत्तरे देत होता.
दुचाकीच्या शीटखालून एमडी हस्तगत
पोलिसांनी संशयित तरुणाची कसून चौकशी केली, यावेळी पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत व दुचाकीच्या शीटखाली प्लास्टिकच्या छोट्या पुडीत पांढऱ्या रंगाची पावडर मिळून आली. फॉरेन्सिक युनिटच्या प्राथमिक तपासणीत सदर पावडर एमडी सदृश अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीच्या एमडीसह ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच संशयित आरोपी कल्पेश रायसिंग याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. उच्चशिक्षीतही अडकले एमडी तस्करीच्या जाळ्यात
पोलिसांनी संशयित कल्पेश रायसिंग याची कसून चौकशी केल्यानंतर तो उच्चशिक्षीत असल्याचे समोर आले. त्याला दहावीला ८९ टक्के गुण होते. त्यानंतर त्याने सिवील म्हणून डिप्लोमाचे शिक्षण घेवून पुण्यात त्याने बीई (अभियांत्रीकीचे) शिक्षण पुर्ण केले आहे. उच्चशिक्षीत तरुण देखील एमडी तस्करीच्या विळख्यात अडकले आहे.
















