जळगाव (प्रतिनिधी) ट्रान्सफार्मर बंद असल्याच्या कारणावरुन सुनिल पितांबर ठाकरे रा. मोहाडी यांनी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंता जयेंद्र भगवान सपकाळे (वय २९, रा. शास्त्रीनगर) यांच्यासोबत हुज्जत घातली. तसेच त्यांना शिवीगाळ करीत अभियंत्याच्या चार ते पाच वेळा कानशिलात लगावल्याची घटना दि. १३ रोजी पावणेचार वाजेच्या सुमारास मोहाडी गावात घडली. याप्रकरणी सुनिल पितांबर ठाकरे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शास्त्री नगरात राहणारे जयेंद्र सपकाळे हे महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहे. त्यांच्या अखत्यारीत शिरसोली प्र.बो, शिरसोली प्र. न, मोहाडी, धानोदा बु. दापोरा व सावखेडा बु. अशी गावे असून याठिकाणी वीजपुरवठा, वीज प्रश्न संबंधित ग्राहकांचे प्रश्न सोडविणे यासह दैनंदिन वीज थकबाकी वसुल करणे ही कामे आहेत. दि. १३ रोजी दुपारच्या सुमारास अभियंता हे कंत्राटी कर्मचारी योगेश नाना ठाकरे रा. कुरंगी, ता. पाचोरा, हे मोहाडी गावात घरगुती ग्राहकांची विजेची थकबाकी वसुली करण्यासाठी गेले होते. वसुली करीत असतांना योगेश ठाकरे यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला, त्याने सांगीतले की, मी सुनिल ठाकरे बोलत असून मोहाडी गावातील तांडा परिसरात ट्रान्सफार्मर बंद आहे. त्याची लाडून लवकर चालू करा असे त्याने सांगितले.
ट्रान्सफार्मर नवीन प्राप्त होताच बसवून देतो असे सांगितले. त्यावेळी कंत्राटी कर्मचारी योगेश ठाकरे याने सांगितले की, माझ्या सोबत सपकाळे साहेब असून तुम्ही त्यांच्यासोबत बोला असे म्हणत त्याने अभियंता सपकाळे यांच्याकडे फोन दिला. यावेळी सपकाळे यांनी समोरील व्यक्तीला तो ट्रान्सफार्मर नादुरुस्त असून नवीन प्राप्त होताच बसवून देवू असे त्यांनी सांगितले. त्यावेळी समोरील व्यक्तीने तू कुठे आहे लवकर मोहाडीत ये असे सांगितले. अभियंता सपकाळे यांनी मी मोहाडी गावातच आहे, चौकात येतो तुम्ही तेथे या असे सांगितले. त्यानंतर अभियंता हे कर्मचाऱ्यासह बस थांब्याजवळ आले.
गावात नोकरी कशी करतो म्हणत लगावल्या काशनशिलात
काही वेळातच सुनिल ठाकरे हा त्याठिकाणी आला आणि फोनवर माझ्याशी तुच बोलला ना असे म्हणत तो शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेला. यामध्ये त्यांच्या शर्टची कॉलर पकडून त्याने अभियंत्याच्या चार ते पाच वेळा कानशीलात लगावली. तसेच तू बाहेर भेट तुला जीवंत सोडणार नाही आमच्या गावात तू कशी नोकरी करतो तुझी नोकरीच घालवतो असे म्हणत तो पुन्हा त्यांना मारहाण करु लागला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुनिल पितांबर ठाकरे रा. मोहाडी याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.