धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर शामराव पाटील यांनी सोसायटीचे कर्ज फेडता न आल्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला होता. त्यातच सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नव्हती. या आर्थिक अडचणींमुळे तणावाखाली असलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांनी अखेर मंगळवारी आपल्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच धरणगाव चे पोलीस निरीक्षक पवन देसले हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर याबाबत धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर पाटील यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून आश्वासन दिले जात असले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केली आहे.