जळगाव (प्रतिनिधी) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक २६ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ठीक ९.१५ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिलह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहिद जवानांच्या पत्नी, आई-वडील, कोरोनायोध्दे जसे-डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेले काही नागरीक तसेच जळगाव शहरातील मर्यादित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी दिनांक २६ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ८.३० ते १०.०० वाजेदररम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध-शासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० च्या पूर्वी किंवा १०.०० वाजेनंतर करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वासाठी मास्क वापरणे बंधणकारक आहे. प्रभात फेऱ्या काढण्यात येऊ नये. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.